हरीश गुप्ता / नवी दिल्लीपाच राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले असले तरी सत्ताधारी ‘रालोआ’ला राज्यसभेत बहुमतासाठी हे संख्याबळ पुरेसे होणार नाही. आता राज्यसभेच्या ७९ जागांसाठी व्दैवार्षिक निवडणूक होईल तेव्हा भाजपा सदस्यांची संख्या ७३ वर जाऊन संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात तो सर्वात मोठा पक्ष होईल, असे दिसते. राज्य विधानसभांचे नवे गणित पाहता राज्यसभेत काँग्रेस ५९ वरून ४२ सदस्यांवर येईल.याच बरोबर मायावती (बसपा), सिताराम येचुरी (मार्क्सवादी), डॉ.करण सिंग (दिल्ली), अभिषेक मनु सिंघवी (राजस्थान) आणि जया बच्चन (सपा) यांच्याखेरीज सचिन तेंडुलकर व रेखा या नियुक्त सदस्यांचे पुन्हा राज्यसभेत येणेही दुरापास्त मानले जात आहे. येत्या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्येही पराभव झाल्यास राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ आणखी रोडावेल. या दोन राज्यांमधन निवडून गेलेले राज्यसभेचे पाच सदस्य निवृत्तहोत आहेत. शिवाय सध्या काँग्रेसकडे असलेल्.या दिल्लीच्या राज्यसभेच्या तिन्ही जागा ए्प्रिल २०१८ मध्ये आम आदमी पार्टीकडे जातील. समाजवादी पक्षाचे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. पण आता उत्तर प्रदेश विधानसभेतून त्यांचा फक्त एकच सदस्य राज्यसभेवर येऊ शकेल. त्यामुळे निवडून येऊ शकणारी ही एकमेव जागा जया बच्चन यांना दिली जाणे अशक्य दिसते. पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसने जागा सोडली तरच तेथून सिताराम येचुरी यांनी पुन्हा राज्यसभेवर आणणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षास शक्य होईल. आताच्या निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे या दोन राज्यांमधून आता भाजपाचे १० सदस्य राज्यसभेवर निवडून येऊ शकतील. उत्तर प्रदेश विधानसभेत बसपाला फक्त १९ जागा मिळाल्याने काँग्रेसने पाठिंंबा दिला व सपाने त्यांची जास्तीची मते दिली तरीही बसपा प्रमुख मायावती पुन्हा राज्यसभेवर निवडून येऊ शकणार नाहीत.
राज्यसभेत बहुमतासाठी भाजपाचे ताजे यशही अपुरे
By admin | Published: March 20, 2017 12:55 AM