नवी दिल्ली - मध्यप्रदेशमधून भारतीय जनता पक्षाने पहिली उमेदवारी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना दिली. त्यानंतर दुसरी उमेदवारी भाजपकडून बडवानी येथील प्राध्यापक सुमेर सिंह सोलंकी यांना देण्यात आली आहे. सुमेर सिंह यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा ते महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत होते.
मध्यप्रदेशमधून सुमेर सिंह यांची उमेदवारी निश्चित होताच, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयात आपला राजीनामा देऊन तातडीने भोपाळ गाठले. ते शहीद भीमा नायक शासकीय महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम पाहात होते.
सुमेर सिंह हे एसटी प्रवर्गातील असून ते सुरुवातीपासूनच आरएसएसशी जोडले गेलेले आहेत. सुमेर सिंह यांचे काका मकन सिंह सोलंकी हे खरगोन-बडवानी खासदार म्हणून होते. सुमेर सिंह यांनी इतिहास विषयात पीएचडी केलेली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीचे वृत्त त्यांना माध्यमातून कळले. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना शिकवत होते.
मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपच्या कोट्यातून प्रभात झा आणि सत्यनारायण जाटिया तर काँग्रेसच्या कोट्यातील दिग्विजय सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.