नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने रविवारी आपले उमेदवार जाहीर केले असून, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांना महाराष्ट्रातून, ग्रामविकासमंत्री राव वीरेंद्र सिंग यांना हरयाणामधून, संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांना राजस्थानातून, संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तारअब्बास नकवी यांना झारखंडमधून, तर वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र विधान परिषदेसाठी भाजपाने सुरजीतसिंह ठाकूर यांचे नाव घोषित केले आहे.या यादीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे नाव नसून, ते कदाचित सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी द्यावी की मध्य प्रदेशातून, याबाबत निर्णय व्हायचा आहे. पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर हे दोन मंत्री महाराष्ट्राच्या कोट्यातून असल्याने प्रभू यांना मध्य प्रदेशातून पाठवावे, असा विचार आहे. राज्यातून भाजपातर्फे तीन जण राज्यसभेवर जातील. आज एकच नाव जाहीर झाले असून, प्रभू यांच्याखेरीज विनय सहस्रबुद्धे यांचे नावही चर्चेत आहे. मात्र एखादा बहुजन समाजाच्या नेत्याला राज्यसभेवर पाठवण्याचा विचार सुरू असून, त्यात श्यामकुमार जाजू व महात्मे यांचे नावही पुढे आहे.या पाचही केंद्रीय मंत्र्यांची मुदत संपल्याने त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणे अपेक्षितच होते. निर्मला सीतारामन या तामिळनाडूच्या असल्या तरी तिथे भाजपाचा एकही आमदार नाही. तसेच आंध्र प्रदेशातून त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपाकडे कमी मते होती. त्यामुळे त्यांना कर्नाटकातून तर आंध्र प्रदेशच्याच वेंकय्या नायडू यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपाने राज्यसभेसाठी एकूण १२ जणांची नावे जाहीर केली आहेत. त्यात केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या वरील मंत्र्यांखेरीज विविध राज्यांतील १३ नेत्यांचा समावेश आहे. पक्षाने राजस्थानातून ओमप्रकाश माथुर, हर्षवर्धन सिंग, रामकुमार वर्मा यांना उमेदवारी दिली असून, गुजरातमधून पुरुषोत्तम पुपाला, मध्य प्रदेशातून अनिल दवे, छत्तीसगडमधून रामविचार नेताम व बिहारमधून गोपाल नारायण सिंग हे राज्यसभेसाठीचे उमेदवार असतील. >कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील विधान परिषदेचे तीन उमेदवारही पक्षाने जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले सुरजीतसिंह ठाकूर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष असून, ते मराठवाड्यातील उस्मानाबादच्या भूम-परांडा येथील आहेत. मराठवाड्यातील भाजपाच्या राजकारणात ते सक्रिय असून, त्यांचे नाव विधान परिषदेसाठी सुरुवातीपासूनच चर्चेमध्ये होते.
राज्यसभेची उमेदवारी : नायडू, नकवी, सीतारामन, गोयल यांना संधी
By admin | Published: May 30, 2016 3:27 AM