ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26- राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेत काँग्रेसचे 45 खासदार आहेत. तर राज्यसभेत बहुमताच्या जोरावर काँग्रेसनं नेहमीच भाजपाला नामोहरम केलं आहे. मात्र ब-याच राज्यांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला पराभव आल्यानं आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे डोकेदुखी वाढली आहे.
राज्यसभेवर जाण्यासाठी नेते जास्त आणि सीट कमी अशी काँग्रेस शोकांतिक आहे. आज तकनं दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेवर जाण्यासाठी चिदंबरम आणि जयराम रमेश यांच्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कर्नाटकातून ऑस्कर फर्नांडिस यांना राज्यसभेवर पाठवण्याचा काँग्रेसनं आधीच निर्णय घेतला आहे. मात्र दुस-या जागेवर चिदंबरम यांना संधी द्यायची की जयराम रमेश या पेचात काँग्रेस अडकली आहे. तर उत्तर प्रदेशमधून इमरान मसूद यांना उमेदवारी देण्यासाठी राहुल गांधी उत्सुक आहेत. मात्र सोनिया गांधी सतीश शर्मा यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती आज तक या वृत्तवाहिनीनं दिली आहे.
महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे आणि अविनाश पांडे यांच्यात उमेदवारीवरून चढाओढ आहे. तर उत्तराखंडमधून किशोर उपाध्याय, प्रदीप टम्टा यांच्यात चढाओढ आहे. हरिश रावत त्यांची पत्नी रेणुका रावतलाही राज्यसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. मध्य प्रदेशमधून महिला काँग्रेस अध्यक्षा शोभा ओझा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी राहुल गांधींनी पसंती दर्शवली आहे, अशी माहिती आज तक या वृत्तवाहिनीनं दिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अजूनही राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले नाही.