नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली आहे. २०१४ पासून काँग्रेसला लागलेलं ग्रहण कायम आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकीतही हेच पाहायला मिळालं. काँग्रेसला पंजाबमधील सत्ता गमवावी लागली. तर इतर ४ राज्यांमध्येही काँग्रेसची कामगिरी सुमार झाली. याचा फटका आता काँग्रेसला राज्यसभेत बसणार आहे.
राज्यांमधील आमदारांच्या संख्येवरून राज्यसभेतील खासदारांचं प्रमाण ठरतं. विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी खराब होत असल्यानं राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांची संख्या आणखी कमी होईल. लवकरच १७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधून काँग्रेसचा एकही सदस्य राज्यसभेवर नसेल. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये काँग्रेसचे राज्यसभेत ३३ खासदार होते. आता ए. के. अँटनी यांच्यासह ४ सदस्य निवृत्त झाले आहेत. तर जून आणि जुलैमध्ये आणखी ९ सदस्यांचा कार्यकाळ संपेल. यामध्ये पी. चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि कपिल सिब्बल यांच्या नावांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर सभागृहातील काँग्रेस सदस्यांची संख्या जास्तीत जास्त ३० असेल असं जाणकार सांगतात. राज्यसभेत काँग्रेस सदस्यांची संख्या कधीच इतकी कमी नव्हती. तमिळनाडूतील ६ जागांपैकी १ जागा द्रमुक आपल्यासाठी सोडेल अशी आशा काँग्रेसला आहे. तसं झाल्यास काँग्रेस सदस्यांची संख्या ३१ होईल. पण उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा, दिल्ली आणि गोव्यातून काँग्रेसचा एकही सदस्य नसेल.
जाणकारांच्या माहितीनुसार १७ राज्यांमध्ये काँग्रेसचं मोठं नुकसान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांमधील काँग्रेसची पाटी कोरी होईल. यामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.