नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दल भाजपाची साथ देणार आहे. संयुक्त जनला दलाचे खासदार हरिवंश यांची उपसभापतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आल्यानं अकाली दलामध्ये नाराजी होती. मात्र भाजपाला ही नाराजी दूर करण्यात यश आलं आहे. त्यामुळे निवडणुकीआधी भाजपाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या उमेदवारावरुन एनडीएमध्ये घमासान सुरू आहे. या पदासाठी अकाली दलाला संधी दिली जाईल, अशी आशा अकाली दलाला होती. मात्र भाजपानं संयुक्त जनता दलाच्या हरिवंश यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अकाली दलामध्ये नाराजी होती. उपसभापतीपदाच्या निवडणुकीवेळी अकाली दलाचे खासदार अनुपस्थित राहणार असल्याचीदेखील चर्चा होती. मात्र भाजपानं अकाली दलाची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे अकाली दल भाजपाच्या बाजूनं मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अकाली दलाची नाराजी दूर झाल्यानंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. उपसभापतीपदासाठी भाजपानं परस्पर संयुक्त जनता दलाला संधी दिली. हरिवंश यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना भाजपानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी संवाद साधला नव्हता. त्यामुळे शिवसेना नाराज आहे. आता अकाली दलाप्रमाणेच शिवसेनेची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अकाली दलाची नाराजी दूर; राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीआधी भाजपाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 12:46 PM