नवी दिल्ली- लोकसभेत मंजूर झालेलं तिहेरी तलाकचं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. तिहेरी तलाक विधेयक सादर करताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आहे.मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं या विधेयकातील अनेक तरतुदींवर तीव्र आक्षेप घेतला आहे. इतर विरोधी पक्षांनीही काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला आहे. विरोधकांच्या ब-याचशा सदस्यांनी या विधेयकाला स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या गदारोळाला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.काही जण विनाकारण विरोधाच्या नावाखाली या विधेयकाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गदारोळानंतर राज्यसभा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यानं भाजपालाही विधेयकाला मंजुरी मिळवून देण्यात अडचणी आल्या आहेत.
राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावरून गदारोळ, काँग्रेसची दुटप्पी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 17:59 IST