ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - महाभारत या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार रुपा गांगुली यांचा गुरुवारी राज्यसभेत आक्रमक अवतार पाहायला मिळाला. काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी विमला आवास कांडप्रकरणातील मुलांच्या तस्करीचा उल्लेख करताच रुपा गांगुली भडकल्या. विमला आवास कांड प्रकरणात पाटील यांनी अप्रत्यक्षपणे माझं नाव घेतले, असा आरोप यावेळी रुपा गांगुली यांनी करत सभापतींकडे बोलू देण्याची मागणी केली.
आपल्या आसन व्यवस्थेवर उभे राहत रुपा गांगुली यांनी सभापतींना सांगितले की, 'मला बोलण्यासाठी वेळ द्यावी. जर बोलण्यासाठी वेळ मिळाला नाही तर त्या सभापतींच्या आसनाजवळ येऊन आपलं म्हणणं मांडणार. माझ्यासोबत भाजपाचे काही खासदारी माझ्या बाजूनं बोलतील'. यानंतर काही वेळाने रजनी पाटील यांच्या वक्तव्याचा विरोध करत रुपा गांगुली सभापतींच्या आसनाजवळ पोहोचल्यादेखील होत्या.
गांगुली यांचे आरोप पाहता सभापतींनी त्यांना वारंवार विचारले की, खासदार रजनी पाटील यांनी थेट तुमचे नाव घेतले का?. यावर रूपा गांगुली म्हणाल्या की, थेट नाही पण इशा-यांमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला गेला. यावर 'सभागृहातील रेकॉर्ड तपासण्यात येईल', असे आश्वासन रूपा गांगुली यांना देण्यात आले. सभापतींकडून आश्वासन मिळाल्यानंतर रूपा शांत झाल्या आणि आपल्या जागेवर परतल्या.
काय आहे विमला आवास कांड?
मुलांची खरेदी-विक्री आणि तस्करी प्रकरणात अटक केलेल्या विमला आवास कांडमधील आरोपी चंदना चक्रवर्तीने मुलांना विकण्याच्या प्रक्रियेत रूपा गांगुली आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या नावाचा उल्लेख केला होता. पश्चिम बंगालच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत चंदनाने या प्रकरणात सहभागी झालेल्या सर्वांना अटक करण्याची मागणी केली होती. चंदना विमला शिशू गृह चालवत होती. तिच्यावर अनेक लहान मुलांची विक्री केल्याचा आरोप आहे.