नवी दिल्ली : देशात कोट्यवधी तरूण आज बेरोजगारीचा सामना करीत आहेत. प्रतिवर्षी २ कोटी लोकांना रोजगार मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते त्याचे काय झाले? रोजगाराची संधी मिळत नसल्याने देशातला तरूण वर्ग आज निराश व हताश आहे. राज्यसभेत शून्यप्रहरात जद (यु)चे नेते शरद यादव यांनी हा विषय उपस्थित करताच सत्ताधारी व विरोधकांमधे खडाजंगी झाली. आसनासमोर घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब केले.आपल्या मुद्याचे स्पष्टीकरण करतांना शरद यादव म्हणाले, भारतात इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्यांना चटकन रोजगाराची संधी मिळते मात्र भारतीय भाषांमधे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. संघटीत क्षेत्रात २0११ साली ९ लाख लोकांना रोजगार मिळत होता आता ती संख्या ३ लाखांवर आली आहे. दिवसेंदिवस नोकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने देशात स्फोटक परिस्थिती आहे. काँग्रेसचे आनंद शर्मा आणि माकपचे सिताराम येचुरींनी देखील बेरोजगारीच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, रोजगार मिळण्यासाठी १00 योग्य उमेदवारांंपैकी फक्त १ व्यक्तिला रोजगार मिळतो ही आजची स्थिती आहे. तरूण पिढीच्या हताश मन:स्थितीचे हेच प्रमुुख कारण आहे. संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी त्यावर म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बेरोजगारीवरून राज्यसभेत खडाजंगी
By admin | Published: July 30, 2016 1:52 AM