नवी दिल्ली : महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात मात्र १0 जागांसाठी ११ उमेदवार उभे असल्याने तेथे निवडणूक होणे अपरिहार्य आहे. बिहारमधून भाजपातर्फे रवीशंकर प्रसाद, जनता दल (संयुक्त) चे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग, व महेंद्र प्रसाद सिंग, राजदचे मनोज सिन्हा व अश्फाक करीम आणि काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंग बिनविरोध निवडून आले.मध्य प्रदेशच्या पाच जागांसाठी थावरचंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान या दोन मंत्र्यांसह अजय प्रताप सोनी व कैलाश सोनी हे भाजपाचे चार व काँग्रेसचे राजमणी पटेल हे बिनविरोध निवडून आले. गुजरातच्या चार जागांवर भाजपातर्फे पुरुषोत्तम पुपाला व मनसुख मांडविया हे केंद्रीय मंत्री तर काँग्रेसतर्फे नारण राठवा व अमी याज्ञिक बिनविरोधी विजयी झाले आहेत. या खेपेस सर्वच पक्षांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे दिसले. राजस्थानातून किरोरी मीना, भूपेंद्र यादव व मदनलाल सैनी हे तिघे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. मीना हे रविवारी भाजपामध्ये आले होते. राजस्थानात काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. राजस्थानातील एका जागेवर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचीही बिनविरोध निवड झाली. आंध्र प्रदेशातील तीन जागांवर तेलगू देसमचे सी. एम. रमेश व के. रवींद्र कुमार आणि वायएसआर काँग्रेसचे व्ही. प्रभाकर रेड्डी विजयी झाले. हरयाणातील एका जागेवर भाजपाचे डी. पी. वत्स बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या १0 जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. तिथे भाजपाने अधिक उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होईल.
राज्यसभेसाठी ८ राज्यांत झाली बिनविरोध निवड, काँग्रेसचे संख्याबळ घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:49 AM