Rajya Sabha Election 2022: भाजपचा राजस्थानातही महाराष्ट्र पॅटर्न! राज्यसभेसाठी अतिरिक्त उमेवार दिला; निवडणुकीत चुरस वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 11:27 AM2022-06-01T11:27:47+5:302022-06-01T11:33:46+5:30
Rajya Sabha Election 2022: अशोक गेहलोत व सचिन पायलट गटातील मतभेद तीव्र झाले असताना, भाजपच्या अतिरिक्त उमेवारामुळे काँग्रेसची अडचण वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
जयपूर: देशासह राज्यात आताच्या घडीला राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha Election 2022) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. अनेक नेते राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराज असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपने राजस्थानमध्येही महाराष्ट्राप्रमाणे डावपेच आखल्याचे दिसत आहे. राजस्थानमध्ये प्रसिद्ध उद्योजक सुभाषचंद्र गोयल यांना उमेदवारी देऊन भाजपने राज्यसभा निवडणुकीतील चुरस वाढवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये असंतोष तीव्र होत असताना, भाजपने ऐनवेळी अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे पक्षाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना टक्कर देण्यासाठी भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीत उतरले आहे. हाच डाव भाजपने राज्यस्थानामध्येही खेळला असून मंगळवारी अचानक उद्योजक सुभाषचंद्र गोयल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला.
महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही घोडेबाजार होण्याची शक्यता
काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी होतील. पण, अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे भाजपकडूनच घोडेबाजाराचा प्रयत्न होईल, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. महाराष्ट्रात भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात तर, राजस्थानात भाजपचा फक्त एक उमेदवार जिंकू शकतो. पण, गोयल यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसने दिलेले तीनही उमेदवार ‘उपरे’
राजस्थानातील स्थानिक नेत्यांना राज्यसभेची संधी देण्याची मागणी काँग्रेस नेतृत्वाने फेटाळल्यानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. काँग्रेसने दिलेले तीनही उमेदवार ‘उपरे’ आहेत. शिवाय, अशोक गेहलोत व सचिन पायलट गटातील मतभेदही तीव्र झाले आहेत. या काँग्रेस अंतर्गत वादाचा लाभ मिळण्याच्या आशेवर भाजपने सुभाषचंद्र गोयल यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार असून काँग्रेसचे दोन तर, भाजपचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. चौथ्या जागेसाठी चुरस निर्माण झाली असून काँग्रेसच्या रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक व प्रमोद तिवारी या तीन उमेदवारांनी अर्ज भरला आहे. तर, भाजपकडून दोन उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यात गोयल यांचा समावेश आहे. त्यामुळे चार जागांसाठी पाच उमेदवारांमध्ये लढाई होईल. राजस्थानमध्ये काँग्रेसकडे १०८ आमदार असून भाजपकडे ७१ मते आहेत. उमेदवाराच्या विजयासाठी प्रत्येकी ४१ मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसला तिसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी १५ मते तर, भाजपला दुसऱ्या उमेदवारासाठी ११ मतांची गरज लागेल.