देशातील ४ राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी प्रत्येक पक्ष खबरदारी घेत होता. परंतु काही राज्यात क्रॉस वोटिंग झाल्याचं पुढे आले आहे. कर्नाटकनंतर राजस्थानमध्येही क्रॉस वोटिंग झाले. याठिकाणी भाजपाला मोठा फटका बसला आहे. धौलपूरच्या आमदार शोभारानी कुशवाह यांनी क्रॉस वोटिंग करत काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मत दिले आहे. शोभा रानी यांचे पती बीएल कुशवाह जेलमध्ये बंद आहेत त्यामुळे गोंधळ झाल्याचा दावा भाजपाने केला आहे.
त्याचसोबत भाजपाचे आणखी एक आमदार कैलाश मीणा यांच्यावरही संशय आहे. कैलाश मीणा यांनी पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीऐवजी दुसऱ्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवली. ज्यानंतर काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हे मतही बाद होऊ शकते. एका आमदाराकडून मत देण्यास चूक झाली असं राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी सांगितले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थान येथे भारतीय जनता पार्टीच्या आकडेवारी गडबड होण्याची चिन्हे आहेत. भाजपाची २ मते बाद झालीत. त्यात शोभारानी कुशवाह आणि कैलाश चंद मीणा यांचा समावेश आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज पाहून कैलाश मीणा यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावरून काँग्रेस-भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. २ मते बाद झाल्याने भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्यसभेत जाण्याचा सुभाष चंद्रा यांचा मार्ग खडतर बनू शकतो.
सुभाष चंद्रा याआधीच हरियाणातून राज्यसभेत गेलेत. परंतु यावेळी राजस्थानमध्ये भाजपाच्या पाठिंब्यावर त्यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु भाजपाची २ मते बाद झाल्याने आकडेवारीचं गणित बिघडू शकते. त्यामुळे सुभाष चंद्रा यंदा राज्यसभेची जाण्याची शक्यता फार कमी असल्याचं बोललं जात आहे. सध्या मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.
शोभारानी कुशवाह यांच्या नाराजीचं कारण अस्पष्टवसुंधरा राजे यांच्या गटातील आमदार मानल्या जाणाऱ्या शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेसला मतदान केल्यानं भाजपात गोंधळ उडाला आहे. काही रिपोर्टनुसार क्रॉस वोटिंग चुकीने झाल्याचं म्हटलं मात्र सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे मागील काही दिवसांपासून शोभारानी कुशवाह पक्षात नाराज होत्या. पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला त्या हजर राहत नव्हत्या. त्या काँग्रेसमध्ये जातील अशीही चर्चा होती.