लोकसभेत जिंकलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांमुळे भाजपाचा फायदा, राज्यसभेत बळ वाढणार, कसे? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 01:58 PM2024-08-22T13:58:57+5:302024-08-22T13:59:29+5:30
Rajya Sabha Election: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकत दमदार कामगिरी केली होती. तसेच संख्याबळ वाढल्याने राहुल गांधी यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपदही मिळालं होतं. मात्र लोकसभेत वाढलेल्या संख्याबळाचा आता काँग्रेसला राज्यसभेमध्ये तोटा होताना दिसत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकत दमदार कामगिरी केली होती. तसेच संख्याबळ वाढल्याने राहुल गांधी यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपदही मिळालं होतं. मात्र लोकसभेत वाढलेल्या संख्याबळाचा आता काँग्रेसला राज्यसभेमध्ये तोटा होताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यापैकी अनेकांनी विजयही मिळवला होता. त्यामुळे त्यांना आता राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसचं राज्यसभेतील संख्याबळ घटलं आहे. मात्र रिक्त झालेल्या जागांवर आपणे उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने या जागांवर आता काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार नाहीत. तसेच या जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे.
राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. तसेच या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचं चित्रही स्पष्ट झालेलं आहे. या जागांवर भाजपाच्या उमेदवारांची विजय निश्चित असल्याने राज्यसभेतील काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं संख्याबळ घटणार आहे. तसेच भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं संख्याबळ वाढणार असून, एनडीएला पहिल्यांदाच राज्यसभेमध्ये बहुमत मिळणार आहे.
यावेळी राज्यसभा खासदार असलेले काँग्रेसचे अनेक नेते लोकसभेवर निवडून आले आहेत. उदाहरणच द्यायचं तर हरियाणातील दीपेंद्र हुड्डा हे त्यांच्यापैकीच एक आहेत. लोकसभेवर निवडून गेल्याने दीपेंद्र हुड्डा यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मात्र हरियाणाच्या विधानसभेत भाजपाचं बहुमत असल्याने येथे भाजपाच्या किरण चौधरी यांचा विजय होणं जवळपास निश्चित आहे. काँग्रेसने येथे उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे किरण चौधरी ह्या बिनविरोध विजयी होणे ही केवळ आता औपचारिकता आहे.
नऊ राज्यांमधील राज्यसभेच्या १२ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा आढावा घेतल्यास ही विरोधात उमेदवार नसल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, बिहार, आसाम येथील प्रत्येकी दोन आणि हरियाणा, राजस्थान, तेलंगाणा, ओदिशा आणि त्रिपुरामधील प्रत्येकी १ अशा १२ जागांचा समावेश आहे. तसेच यापैकी ११ जागांवर बिनविरोज भाजपा आणि एनडीएच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. तर तेलंगाणामधील एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार आहे.
सद्यस्थितीत राज्यसभेमधील २० जागा रिक्त आहेत. त्यापैका १२ जागांवर निवडणूक होत आहे. तसेच या १२ जागांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यसभेतील सदस्यसंख्या वाढून २३७ एवढी होईल. या १२ जागांसाठीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाची राज्यसभेतील सदस्यसंख्या ही ८७ वरून वाढून ९७ एवढी होईल. तसेच नियुक्त आणि अपक्ष खासदारांची संख्या जोडल्यास हा आकडा १०४ पर्यंत पोहोचतो. तर एनडीएची सदस्यसंख्या वाढून ११९ एवढी होईल. त्यामुळे २३७ सदस्य असलेल्या सभागृहात एनडीएकडे काठावरचे बहुमत असेल.