राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला मतदान पार पडणार आहे. आता निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. राजस्थान, हरयाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार जागांवर मोठा पेच निर्माण झाला आहे. अशात आता घोडेबाजार आणि क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहे. एकीकडे जमवाजमवीचं राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे पक्षांनी आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये नेलं आहे. आमदार इकडे तिकडे जाऊ नये, यासाठी आता पाहाराही देण्यात येतोय.
राजस्थानपासूनमहाराष्ट्रापर्यंत आपले आमदार फुटू नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि पाठिंबा देणाऱ्या इतर आमदारांना उदयपूरच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. गेहलोत हे सातत्याने आमदारांच्या संपर्कात आहेत. तर ते प्रत्येक आमदाराशी ते वैयक्तिकरित्या बोलतही आहेत. काँग्रेसचे तीनही उमेदवार मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी हेही उदयपूर रिसॉर्टमध्ये उपस्थित आहेत.
भाजपही आपल्या आमदारांबाबत सावधगिरी बाळगत आहे. भाजपच्या सर्व आमदारांना जयपूरबाहेरील रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, ट्रेनिंग कॅम्पमध्ये अनेक सेशन्स होतील असंही भाजप नेत्यांनी सांगितलं आहे. जयपूर-आग्रा महामार्गावर काही आमदार स्वतःहून रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी आले आहेत. त्याचवेळी इतर आमदार दोन बसने रिसॉर्टमध्ये स्थलांतरित झाले आहेत. भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार सुमारे ६० आमदार प्रशिक्षण शिबिरात पोहोचले आहेत. राज्यसभेतील मतदानाचे प्रशिक्षण देण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते आमदारांनाही संबोधित करू शकतात, अशी माहिती भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली.
हरयाणातही अशीच काही परिस्थिती आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांच्यासह अनेक मोठे नेते रायपूरच्या रिसॉर्टमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी आमदारांनाही ठेवण्यात आलं आहे. तसंच क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी आमदारांशी सातत्यानं चर्चाही केली जात आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी मोर्चा सांभाळला आहे. त्यांनी शिवसेना आणि समर्थन देणाऱ्या आमदारांची भेट घेतली. यादरम्यान, त्यांनी सर्वांना एकत्र राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच भाजप निवडणुकीत घोडेबाजाराचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी चुरसमहाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात भाजपने ३ उमेदवार उतरवले आहेत, तर महाविकास आघाडीनं ४ उमेदवार उतरवलेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४२ आमदार हवेत. महाविकास आघाडीकडे १६८ आमदारांचं समर्थन आहेत. यात शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादीचे ५३ आणि काँग्रेसचे ४४, तर अन्य पक्षांचे ८, ७ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तर भाजपकडे १०६ आमदार आहेत. अन्य ७ आमदारांना त्यांना पाठिंबा दिला आहे.
शिवसेना-भाजपत सामनाअशात भाजप दोन उमेदवारांना सहजरित्या जिंकवू शकते. दरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अनिल बोंडे सहजरित्या राज्यभेत पोहोचू शकतात. तर तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याकडे २९ मतं आहे. अशात त्यांना विजयासाठी १३ मतांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला सहावी जागा जिंकण्यासाठी १५ मतांची गरज आहे. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात थेट सामना होणार आहे.