नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची धूळधाण उडाली. पाचपैकी केवळ एका राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मात्र तिथली सत्तादेखील काँग्रेसला गमवावी लागली. याचा फटका काँग्रेसला राज्यसभेत बसला आहे. लोकसभेत काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के जागा जिंकाव्या लागतात. तितकं संख्याबळ काँग्रेसकडे नाही. आता राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडून जाऊ शकतं.
२०२२ मध्ये राज्यसभेच्या जवळपास ७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेत सध्या काँग्रेसचे ३४ सदस्य आहेत. यंदा होत असलेल्या निवडणुकानंतर काँग्रेसची सदस्यसंख्या २५ च्या खाली येऊ शकते. तसं झाल्यास पक्षाकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद जाईल. राज्यसभेतील एकूण सदस्यसंख्या २५० आहे. यातील २३८ सदस्य निवडून येतात. तर १२ सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात.
राज्यांमधील आमदार राज्यसभेचे खासदार निवडतात. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांमधील निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. याचा परिणाम राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार आहे. ३१ मार्चला राज्यसभेच्या १३ जागांसाठी निवडणूक होईल. यातील ५ जागा पंजाबच्या आहेत. तर इतर ८ जागांमध्ये आसामच्या २, केरळच्या ३, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
वर्षाअखेरीस उत्तर प्रदेशातील ११, बिहारच्या ५, राजस्थानच्या ४, मध्य प्रदेशच्या ३ आणि उत्तराखंडच्या एका राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. याशिवाय ओदिशा, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील जागांवरही निवडणुका आहेत. पंजाबमधील मोठ्या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे १८ आमदार आहेत. तर आपचे ९२ उमेदवार निवडून आले. त्यामुळे पंजाबमधील राज्यसभेच्या पाचही जागा आपकडे जातील. त्यामुळे आपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या ३ वरून ८ वर जाईल.
केरळमधील एक जागा काँग्रेसला मिळेल. आसाममधील एक जागाही काँग्रेसला मिळू शकेल. राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या लवकरच १०० च्या पुढे जाईल. याशिवाय भाजपप्रणित एनडीए बहुमताचा आकडा गाठेल. सध्या राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या ९७ आहे. निवडणुकांनंतर ती १०४ होईल. तर एनडीएचं संख्याबळ १२२ पर्यंत जाईल. त्यामुळे २४३ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत एनडीएकडे बहुमत असेल.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसताना दिसत आहे. सध्या राज्यसभेत काँग्रेसचे ३४ सदस्य आहेत. वर्षाअखेरीस हा आकडा २७ पर्यंत येईल. राज्यसभेच्या काँग्रेसच्या सदस्यांनी पक्ष सोडल्यास हा आकडा २५ च्या खाली येऊ शकतो. तसं झाल्यास विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या हातून जाईल.