Karnataka Rajya Sabha Election ( Marathi News ) : देशभरातील राज्यसभेच्या ५६ पैकी ४१ जागांवरील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित १५ जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यसभेच्या ज्या १५ जागांसाठी मतदान झाले त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील १०, हिमाचल प्रदेशमधील एक आणि कर्नाटकमधील ४ जागांचा समावेश आहे. मतदानादरम्यान सर्वच राज्यांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचं पाहायला मिळालं. हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विरोधकांना धक्का देत त्यांची मते फोडण्यात यश मिळवलं. कर्नाटकमध्ये मात्र उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजपला धोबीपछाड देत एक आमदार फोडण्यात यश मिळवलं. भाजपचे आमदार एसटी सोमशेखर यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं आहे.
कर्नाटकमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी काँग्रेसने ३ आणि भाजपा-जेडीएस आघाडीने २ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. विधानसभेचे २२४ सदस्य असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे १३५ आमदार आहेत. तर भाजपाचे ६६ आणि जेडीएसचे १९ आमदार आहेत. दोन अपक्ष आणि इतर ४ आमदार आहेत. कर्नाटकात राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी रस्सीखेच सुरू असून काँग्रेस आणि भाजप-जेडीएस आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे आपल्या अचूक रणनीतीसाठी ओळखले जातात. तसंच अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेससाठी संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. अशातच आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानातही त्यांनी भाजप आमदाराला फोडण्यात यश मिळवलं असून भाजपच्या एका आमदाराने क्रॉस वोटिंग केलं आहे.
कोणत्या जागांवर बिनविरोध निवडणूक?
राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवड जाहीर झालेल्या ४१ उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपत नव्याने आलेले अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल. मुरुगन यांचा समावेश आहे. तसेच बिनविरोध निवड झालेल्या ४१ जागांपैकी २० जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ६, तृणमूल काँग्रेसने ४, वायएसआर काँग्रेसने ३, आरजेडीने २, बीजेडीने २ आणि शिवसेना, बीआरएस आणि जेडीयूने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. या जागांवर अन्य उमेदवार नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयी घोषित केले.