नवी दिल्ली - राज्यसभेच्या निवडणुकीला शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. या निवडणुकीत मविआच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. त्यावर दीड तास केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करून मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील तासाभरात राज्यसभेच्या मतदानाचा निकाल लागू शकतो. इतर ४ मतांसह मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सुहास कांदे यांचे मत बाद झाल्याने शिवसेनेला झटका बसला आहे. सुहास कांदे यांनी मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधींसह दुसऱ्या व्यक्तीलाही दाखवल्याचा आरोप होता. त्याबाबत व्हिडीओ फुटेज पाहून केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकतेयाबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मत दिल्यानंतर ते पक्षाच्या एजंटला दाखवणे आवश्यक असते, तसे केले नाही तर पक्षाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, पक्ष कारवाई करू शकतो. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रला वेठीस धरून, मोठा संभ्रम निर्माण करून, गैरसमज पसरत असतील तर, त्याचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी मी येथे आलो आहे. "मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते ऐकूण मी मतदानासाठी गेलो. मतदान केल्यानंतर मी ते माझ्या पक्षांच्या एजंटना दाखवले. तेव्हा कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. त्यावेळी मी थोडा हसलो. त्याला वेगळे कारण होते. यानंतर मतपत्रिका बंद करून मी बाहेर आलो, मतदान पेटीकडे गोलो, मतदान टाकले आणि बाहेर निघून गेलो असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
तर महाराष्ट्राला वेठीस धरण्याची एकही संधी दिल्ली सोडत नाही. महाराष्ट्राच्या शत्रूंना कोपरापासून नमस्कार! आज नमस्कार. उद्या हात सोडावा लागेल हे लक्षात ठेवा! भारतीय जनता पक्षाने देशातील लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा, आणि निवडणुक आयोगास देखील पकडीत घेतले आहे. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महाविकास आघाडीच असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.