नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने मंगळवारी गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक जाहीर केली. यामध्ये गोव्यातील राज्यसभेची 1, गुजरातमधील 3 आणि पश्चिम बंगालमधील 6 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत 13 जुलै आणि 24 जुलै रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 24 जुलै रोजीच होणार आहे.
गोव्यातील विनय तेंडुलकर यांचा कार्यकाळ 28 जुलै रोजी संपत आहे, तर गुजरातमधील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, दिनेश जेमलभाई अनावडिया आणि जुगलसिंग माथुर्जी यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. पश्चिम बंगालमधील डेरेक ओब्रायन, डोला सेन, प्रदीप भट्टाचार्य, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंदू शेखर रे यांचाही कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. पश्चिम बंगालमध्ये लुझिन्हो जोआकिम फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरही निवडणूक होणार आहे. या जागेची मुदत 2 एप्रिल 2026 पर्यंत असेल.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची फेरनिवड होईलगुजरातमध्ये राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. त्यापैकी आठ जागा भाजपच्या तर तीन जागा काँग्रेसकडे आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, दिनेश अनावडिया आणि जुगल ठाकोर (लोखंडवाला) यांचा गुजरातमधून राज्यसभेतील कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. भाजप परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना राज्यसभेवर पाठवू शकते.