क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदाराची हकालपट्टी; हायकमांडची सक्त कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 11:08 PM2022-06-11T23:08:17+5:302022-06-11T23:13:03+5:30
निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सात तासांहून अधिक उशिराने मतमोजणी सुरू झाली
चंदीगड: हरियाणामधून राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते कुलदीप बिश्नोई यांची तातडीनं सर्व पदांवरून हकालपट्टी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप बिश्नोई यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारसही सभापतींकडे केली जाऊ शकते. याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल. कुलदीप बिश्नोई(kuldeep Bishnoi) हे सध्या काँग्रेस कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य होते.
हरियाणातून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्विट केले होते की, 'माझ्याकडे चिरडण्याचे कौशल्य आहे, सापांच्या भीतीने जंगल सोडत नाही. शुभ प्रभात. त्याचसोबत योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो असंही त्यांनी सांगितले.
भाजप आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का बसला, भाजपाचे कृष्णलाल पनवार आणि भाजपा समर्थक अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी हरियाणातून राज्यसभेच्या जागांवर विजय मिळवला. निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांच्या विजयाची घोषणा केली. निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सात तासांहून अधिक उशिराने मतमोजणी सुरू झाली आणि मध्यरात्री दोन वाजता निकाल जाहीर झाला.
माकन यांना २९ मते
रिटर्निंग ऑफिसर आर के नंदल यांनी सांगितले की, पंवार यांना ३६ मते मिळाली, तर २३ प्रथम पसंतीची मते शर्मा यांच्या खात्यात गेली आणि ६.६ मते भाजपाकडे हस्तांतरित झाली, एकूण मतांची संख्या २९.६ झाली. या अटीतटीच्या लढतीत माकन यांना २९ मते मिळाली पण दुसऱ्या पसंतीचे मत न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.