मतदानापूर्वीच NDA ने राज्यसभेत गाठला बहुमताचा आकडा, 12 सदस्यांची बिनविरोध निवड...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 09:06 PM2024-08-27T21:06:11+5:302024-08-27T21:07:03+5:30
Rajya Sabha Election : या विजयासह एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या आता 112 वर पोहोचली आहे.
Rajyasabha Election : भाजपच्या नेतृत्वातील NDA सरकारने मंगळवारी (27 ऑगस्ट) राज्यसभेत पुन्हा बहुमताचा आकडा गाठला. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदानापूर्वीच भाजपचे 9 आणि मित्रपक्षांचे 2 सदस्य बिनविरोध निवडून आले. या विजयासह भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ 96 झाले आहे, तर एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या आता 112 वर पोहोचली आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या इतर तीन सदस्यांमध्ये एनडीएचा मित्रपक्ष राष्ट्रवादी(अजित पवार गट) आणि राष्ट्रीय लोक मंचचा एक सदस्य आहे. याशिवाय सत्ताधारी एनडीएला सहा नामनिर्देशित आणि एका अपक्ष सदस्याचाही पाठिंबा आहे. दरम्यान, काँग्रेसचा एक सदस्यही बिनविरोध निवडून आला आहे. दरम्यान, राज्यसभेत बहुमत मिळाल्यामुळे भाजपला अनेक विधेयके मंजूर करुन घेणे सोपे होणार आहे.
भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध विजयी
9 राज्यांतील 12 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिशामधून ममता मोहंता, राजस्थानमधून रवनीत सिंग बिट्टू आणि त्रिपुरातून राजीव भट्टाचार्जी यांचा समावेश आहे. याशिवाय, तेलंगणातून काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांची बिनविरोध निवड झाली.
राज्यसभेचे संख्याबळ
राज्यसभेच्या एकूण 245 जागा आहेत. यापैकी सद्यस्थितीत 8 जागा रिक्त आहेत. त्यापैकी चार जम्मू-काश्मीरमधील आणि चार नामनिर्देशित सदस्यांसाठी आहेत. सभागृहाचे सध्याचे संख्याबळ 237 आहे, त्यामुळे बहुमताचा आकडा 119 आहे.