राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! 58 जागांसाठी 23 मार्चला होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 08:37 PM2018-02-23T20:37:13+5:302018-02-23T20:37:13+5:30
यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचे बिगुल आज वाजले. कार्यकाळ संपत असलेल्या एकूण 58 सदस्यांच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी...
नवी दिल्ली - यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचे बिगुल आज वाजले. कार्यकाळ संपत असलेल्या एकूण 58 सदस्यांच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रामधील सहा जागांचा समावेश आहे. त्याबरोबरच केरळमधील एका जागेसाठी पोटनिवडणुकही होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
येत्या एप्रिल आणि मे महिन्यात 16 राज्यांमधील राज्यसभेच्या एकूण 58 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 58 जागांसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 12 मार्च आहे. तर या जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे.
Voting to be held on March 23 for elections to 58 Rajya Sabha seats from 16 states. Last date of filing nominations is March 12.
— ANI (@ANI) February 23, 2018
राज्यसभेतील कार्यकाळ संपत असलेल्या प्रमुख सदस्यांमध्ये अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या सहा मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर, जया बच्चन, रेखा, चिरंजीवी, हे नामवंतही एप्रिलमध्ये निवृत्त होत आहेत. कार्यकाळ संपत असलेल्या महाराष्ट्रातील सदस्यांमध्ये वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील, राजीव शुक्ला (काँग्रेस), अजय संचेती (भाजपा), अनिल देसाई (शिवसेना) यांचाही त्यात समावेश आहे.