- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत काँग्रेसनेराजस्थानात भाजपवर मात करीत दोन जागा जिंकल्या. तथापि, भाजपने मध्यप्रदेशातून राज्यसभेची एक अतिरिक्त जागा जिंकून काँग्रेसला हादरा दिला. राजस्थानमधून काँग्रेसचे के. वेणुगोपाल आणि नीरज डांगी राज्यसभेवर निवडून आले आहेत. मध्यप्रदेशातून भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे, सुमेरसिंह सोळंकी आणि काँग्रेसचे दिग्विजयसिंह विजयी झाले आहेत.काँग्रेसने तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने गुजरातमधील मतमोजणी लांबणीवर पडली. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरुद्ध आपले आमदार पळवत असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले आमदार विविध हॉटेलमध्ये ठेवले होते; परंतु अखेर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या रणनीतीमुळे काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले.गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, झारखंड, तसेच मणिपूर, मिझोराम आणि मेघालयसह आठ राज्यांतील राज्यसभेच्या १९ जागांसाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या जागांसाठी २६ मार्च रोजीच निवडणूक घेण्यात येणार होती; परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.मणिपूरमध्ये विपरीत राजकीय स्थिती असताना भाजपचे लेईसेम्बा सनजाओबा हे विजयी झाले. दुसरीकडे, काँग्रेसला आपले उमेदवार टी. मंगी बाबू यांचा विजय निश्चित करण्यासाठी अन्य पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळविण्यात यश येऊनही त्यांना विजय मिळाला नाही. यावरून मणिपूरमधील बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार सुरक्षित असल्याचे संकेत मिळतात.झारखंडमधून झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन आणि भाजपचे दीपक प्रकाश निवडून आले आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला मात्र पराभव पत्करावा लागला. झारखंड सरकारमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा भागीदार आहे.मेघालयात एनपीपीचे उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट होते व विरोधी काँग्रेसचा उमेदवार जिंकण्याची कोणतीही शक्यता नव्हती. मिझोराममध्ये एमएनएफचा उमेदवार सहजपणे निवडून आला. एमएनएफची राज्यात सत्ता आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशमध्ये राज्यसभेच्या चारही जागा जिंकल्या. त्या त्यांच्याकडे तेवढी संख्या होती म्हणूनच.
Rajya Sabha Election Results: राजस्थानमधून दोन जागा जिंकत काँग्रेसची भाजपवर सरशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 2:27 AM