व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख २१ सप्टेंबर असल्याने काँग्रेस नेतृत्वाखाली चार दिवसांत उमेदवारांबाबत निर्णय घ्यावा लागेल.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हेही याच मोहिमेवर राजधानी दिल्लीत आहेत. अनेक कारणांमुळे यावेळी उमेदवाराची निवड करण्याचा मुद्दा महत्त्वपूर्ण बनला आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसचा लोकसभेत एकच सदस्य आहे. दुसरे म्हणजे महाराष्ट्र विधानसभेतही काँग्रेस चौथ्या स्थानी आणि सत्तारूढ महाविकास आघाडीत कनिष्ठ भागीदार आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला उमेदवार निश्चित करण्यासाठी वेगळ्या मापदंडाचा अवलंब करावा लागेल.
राज्याबाहेरचा उमेदवार लादणे आणि कमजोर व्यक्तीला उमेदवारी देणेही पक्षाच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते, अशी भीती काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.