नवी दिल्ली : राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. राज्यसभेत जुलै आणि ऑगस्टमध्ये 10 जागा रिक्त होत आहेत, ज्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (गुजरात) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) नेते डेरेक ओब्रायन (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. तसेच, इतर ज्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये गोव्यातील भाजपचे सदस्य विनय डी. तेंडुलकर, गुजरातमधील जुगलसिंह लोखंडवाला आणि दिनेशचंद अनावडिया, टीएमसी सदस्य डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि पश्चिम बंगालमधील सुखेंदू शेखर राय यांचा समावेश आहे. याशिवाय, काँग्रेस सदस्य प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे.
राज्यसभा निवडणुकीतील राज्यांच्या विधानसभांचे अंकगणित पाहिल्यास गुजरातमधून भाजपच्या तीन सदस्यांची निवडणूक निश्चित मानली जाते, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही समावेश आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपचे 157 सदस्य आहेत. जर मतदानाचा विचार केला तर एक जागा जिंकण्यासाठी 46 मतांची गरज आहे. तीनही जागा जिंकण्यासाठी 138 मतांची गरज आहे. अशा स्थितीत भाजप पुन्हा तीनही जागा जिंकणार हे निश्चित आहे. याचबरोबर गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत, त्यापैकी भाजपकडे 20 आणि तीन अपक्षही भाजपकडे आहेत. मतांच्या गणितानुसार, गोव्याची जागाही भाजपकडे जाणे निश्चित आहे. म्हणजेच भाजप यावेळी आपल्या चारपैकी चार जागा राखणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये काय आहे स्थिती? पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत असून त्यात काँग्रेसचे प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे एक जागा रिक्त होत आहे. विधानसभेत काँग्रेस शून्य आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातून ही जागा जाणार असल्याचे निश्चित आहे. बंगाल विधानसभेत 294 सदस्य आहेत आणि कोणत्याही उमेदवाराला राज्यसभेत पोहोचण्यासाठी 43 आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. एका जागेवर भाजपचा विजय निश्चित आहे. त्यानंतरही पक्षाकडे 34 आमदारांची मते असतील. तर टीएमसीला पाच जागा जिंकण्यासाठी 215 मतांची गरज आहे. टीएमसीचे काही आमदार तुरुंगात आहेत. अशा स्थितीत पाचवी जागा वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या गणितात थोड्याफार फरकाने टीएमसी मागे पडल्याचे दिसते. भाजपने दोन उमेदवार उभे केल्यास ही लढत रंजक ठरू शकते.
राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्षसध्या राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचे 93 सदस्य आहेत. काँग्रेस 31 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीएमसीचे 12 खासदार आहेत. 10 जागांवर झालेल्या निवडणुकीनंतर राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ एका जागेच्या वाढीसह 93 वरून 94 वर पोहोचेल आणि एका जागेच्या नुकसानासह काँग्रेस 31 वरून 30 जागांवर येईल.