पाच राज्यांच्या मिनी लोकसभा निवडणुका संपताच राज्यसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या होणार आहेत. जवळपास ७२ राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. यापैकी अनेकांना पुन्हा सदस्य होता येणार नाही, तर काहीजण पुन्हा सदस्य होऊ शकतात. त्या त्या राज्यातील कोट्यानुसार, राजकीय परिस्थितीनुसार या जागा जिंकल्या जाणार आहेत.
आज राज्यसभेत या सदस्यांचे काम आणि योगदानावर चर्चा करण्यात आली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी अनेक सदस्यांचे नाव घेत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सदस्यांना आज निरोप दिला. आज राज्यसभेत शून्य प्रहर किंवा प्रश्नकाळ होणार नाही, यामुळे विविध पक्षांचे नेते, सदस्य या निरोप समारंभात बोलू शकणार आहेत.
एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये आनंद शर्मा, ए. के अँटनी, सुबमण्यम स्वामी, मेरी कोम आणि स्वप्न दासगुप्ता यांचा समावेश आहे. तर जूनमध्ये अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, सुरेश प्रभू, एम जे अकबर, जयराम रमेश, विवेक तन्खा, वी विजयसाई रेड्डी यांचा कार्यकाळ संपत आहे.
जुलैमध्ये पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नकवी, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, कपिल सिब्बल, सतीश चंद्र मिश्रा, संजय राउत, प्रफुल्ल पटेल आणि के. जे अल्फोंस हे सेवा निवृत्त होत आहेत. यापैकी भाजपा आणि काँग्रेसचे काही सदस्यांना पुन्हा संधी मिळेल की नाही याबाबत काहीही सांगता येत नाहीय. यापैकी काही सदस्य हे काँग्रेसच्या जी -२३ मधील आहेत. यामुळे सारेकाही राजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे.
मोदी म्हणाले परत या....
मोदी म्हणाले की, मला खात्री आहे की आज निरोप घेणार्या सहकाऱ्यांकडून आपण जे काही शिकलो आहोत, ते नक्कीच देशाच्या प्रगतीसाठी वापरू. सोबती जात आहेत पण बंगाली किंवा गुजरातीमध्ये जसे ते म्हणतात…बाय-बाय म्हणजे पुन्हा या, असे मी या सदस्यांना म्हणेन. मी प्रत्येकाच्या कामाचा वैयक्तिक उल्लेख करत नाही. सभापतींनी मला सांगितलेय की जेव्हा ते वैयक्तिक भेटतील तेव्हा त्यांच्याशी बोला. निवृत्त होत असलेल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा, असे म्हणत मोदींनी आपले मनोगत संपविले.