ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - बँकांचे काही हजार कोटी रुपये बुडवून परदेशात निघून गेलेल्या विजय मल्ल्याने राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. एथिक्स कमेटीने त्यांना तशी नोटीस बजावली होती. कोट्यवधींचे कर्ज डोक्यावर असताना विदेशात पळून गेलेले विजय मल्ल्या यांची राज्यसभेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी शिफारस राज्यसभेच्या नीतिमूल्य समितीने केली होती.
दरम्यान, विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यसभेच्या गेल्या अधिवेशनात मल्ल्याच्या हकालपट्टीसाठी नोटीस दिली होती. राज्यसभेचे अध्यक्ष डॉ. हमीद अन्सारी यांनी हे प्रकरण नीतिमूल् समितीकडे सोपवले होते. समितीने त्या प्रकरणाचा विचार करून वरील शिफारस केली आहे. मल्य्याची मुदत यावर्षीच्या जुलैमध्ये संपणार आहे.
विजय मल्ल्या हे २ मार्च रोजी भारतातून ब्रिटनला गेले होते. त्यांच्याकडे बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. देशातील प्रमुख १३ बँकांच्या कर्जाचा यात समावेश आहे.
दरम्यान, विजय मल्ल्या याची आणि त्याच्या कुटुंबाची मालमत्ता उघड करण्यात यावी, अशी विनंती संबंधित बँकांतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसे केल्यास त्याच्याकडील थकबाकी वसूल करणे सोपे होईल, असे या बँकांचे म्हणणे आहे.