राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू आहे. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी अमर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएचं सरकार असताना सिंह यांचं नाव कायम चर्चेत असायचं. मुलायम सिंह यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. मात्र नंतर हे संबंध बिघडले. त्याबद्दल फेब्रुवारी महिन्यात सिंह यांनी माफीदेखील मागितली होती.गेल्या काही महिन्यांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. ते आयसीयूमध्ये होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. ५ जुलै २०१६ रोजी त्यांची खासदार म्हणून निवड झाली. समाजवादी पक्षापासून दूर गेल्यानंतर त्यांची राजकारणातील सक्रियता कमी झाली होती. प्रकृतीच्या समस्या उद्भवण्यापूर्वी ते भाजपाच्या जवळ गेले होते. देशात यूपीएचं सरकार असताना आणि समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव यांचा शब्द अंतिम समजला जात असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते.
राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 4:53 PM