नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटला तरी अद्याप सत्ता संघर्षाचा पेच सुटत नसल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला जात आहे. मात्र, यातच आता ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सर्वोच्च न्यायालयात गेल्या ५० वर्षांपासून वकिली करत असून, न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही, असे विधान केले आहे.
कपिल सिब्बल यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे. ज्या न्यायालयात न्यायाधीशांची निवड तडजोडीच्या प्रक्रियेद्वारे होते, असे न्यायालय कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही. न्यायालयांमध्ये कोणत्या खंडपीठापुढे प्रकरणांची सुनावणी होईल हे ठरवण्यासाठी प्रक्रिया नाही. सरन्यायाधीशच याबाबतीत निर्णय घेतात, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेबाबत गंभीर टिप्पणी केली आहे.
या न्यायव्यवस्थेवर आता विश्वास उरला नाही
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही निकालांवर नाराजी व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयात तब्बल ५० वर्ष वकिली केल्यानंतर या न्यायव्यवस्थेवर आता विश्वास उरला नाही, असे कपिल सिब्बल म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. मात्र, वास्तवात यामुळे फार बदल झालेले दिसले नाहीत. स्वातंत्र्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यासाठी आवाज उठवू आणि स्वातंत्र्याची मागणी करू, असे सिब्बल म्हणाले. यावेळी सिब्बल यांनी कलम ३७७ हटवण्यासंदर्भातील निर्णयावरही बोट ठेवले. दुसरीकडे, झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याच्या मुद्द्यावर सिब्बल यांनी या कार्यक्रमात बोलणे टाळले होते. गुजरात दंगली प्रकरणात तत्कालीन भाजपा सरकारला एसआयटीने क्लीनचिट दिल्याच्या निर्णयाविरोधात जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती. याप्रकरणात सिब्बल याचिकाकर्त्यांचे वकील होते.
दरम्यान, शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड व अन्य मुद्द्यांवर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याची त्यांची मागणी असून, शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांची नोटीस रद्द करण्याची विनंती केली आहे. या याचिकांमध्ये कपिल सिब्बल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लढत आहेत.