नवी दिल्ली : शब्दांचे बाण…टोमणे…अगदी शिव्याही...देशाच्या संसदेत अनेकदा तुम्हाला ही दृश्ये पाहायला मिळतात. पण, व्हॅलेंटाईन डेमुळे लोकशाहीच्या मंदिरातील वातावरणही काहीसे प्रेमळ झाल्याचे दिसत आहे. इथल्या तणावपूर्ण वातावरणातही प्रेमाचे शब्द ऐकायला मिळत आहेत. राजस्थानचे काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचे भाषणातील काही भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यादरम्यान ते असे काही बोलले, ज्यावर राज्यसभेत एकच हशा पिकला.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणातील काही शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यावरुन प्रमोद तिवारी यांनी उपस्थित केलेल्या पॉइंट ऑफ ऑर्डर दरम्यान झालेल्या चर्चेत प्रमोद तिवारी म्हणाले की, खर्गे यांनी तुमच्या प्रेमात कविता केली आहे. प्रत्युत्तरात राज्यसभेचे अध्यक्ष (उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष असतात) जगदीप धनखर म्हणाले, "कवितेतून प्रेम निर्माण होते की प्रेमातून कविता निर्माण होते हे मला समजत नाही."
त्यानंतर प्रमोद तिवारी यांनी विचारले, “सर, तुम्ही कितीवेळा प्रेम केले आहे…हे सांगा. खरंच कोणतंही प्रेम आठवलं तर त्यात कविता आपोआप घडते. आणि आम्ही सगळे तुमच्यावर प्रेम करतो, म्हणूनच विरोधीपक्ष नेत्यांनी तुमच्यावर कविता केली. प्रेमात असंच असतं सर. तुम्ही पहिल्यांदा प्रेमात कधी पडलात?'' यावर अध्यक्षांनी काहीच उत्तर दिले नाही.
खर्गे यांच्या माफीवर भाजप ठामभाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली भाजप मल्लिकार्जुन खर्गे यांच्या माफीनाम्यावर ठाम राहिले. कालच्या काँग्रेस सदस्यांच्या वर्तनाबद्दल (पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी) खर्गे माफी मागत नाहीत, तोपर्यंत खर्गेंना बोलू दिले जाणार नाही, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.