Swati Maliwavl vs Atishi Marlena : कथित मद्य घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे आपच्या मंत्री आतिशी मार्लेना यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र आता त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनणार असलेल्या आतिशी यांच्यावर मोठा आरोप केला आहे. स्वाती मालीवाल यांनी केलेल्या या आरोपांमुळे दिल्लीच्या आम आदमी पक्षात खळबळ उडाली आहे. आप नेत्यांकडून आता स्वाती मालिवाल यांना लक्ष्य केलं जात आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेनंतर मंत्री आतिशी मार्लेना या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत. मात्र आता आतिशी यांच्यावर आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी गंभीर आरोप केला. दहशतवादी अफजल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी आतिशीच्या आई-वडिलांनी लढा दिल्याचं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे. १३ मे रोजी केजरीवाल यांच्या निवासस्थानावर आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप करून मालीवाल यांनी याला देशाच्या सुरक्षेशी जोडले आणि हा दिवस दिल्लीसाठी दुःखाचा दिवस असल्याचे सांगितले.
"दिल्लीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे. आज एका महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री बनवले जात आहे, जिच्या कुटुंबाने दहशतवादी अफझल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढा दिला. दहशतवादी अफझल गुरूला वाचवण्यासाठी त्यांच्या पालकांनी माननीय राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज लिहिला. त्यांच्या मते अफजल गुरू निर्दोष होता आणि त्याला राजकीय कटाचा भाग म्हणून गोवण्यात आले होते. आतिशी मार्लेना या फक्त डमी मुख्यमंत्री असल्या तरी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देव दिल्लीचे रक्षण करो!," अशी पोस्ट स्वाती मालिवाल यांनी केली होती.
यानंतर आता मालिवाल यांनी आणखी एक धक्कादायक आरोप आतिशी यांच्यावर केला. संसद हल्ल्यातील आरोपी सय्यद अब्दुल रहमान गिलानी याच्याशी आतिशीच्या आई-वडिलांचे सखोल संबंध असल्याचे स्वाती मालिवाल यांनी म्हटलं. "आतिशी मार्लेनांच्या आई-वडिलांचे एसएआर गिलानी याच्याशी सखोल संबंध होते. संसदेवरील हल्ल्यातही गिलानी याचा हात असल्याचा आरोप त्याच्यावर होता. २०१६ मध्ये त्यांनी दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये अफजल गुरूच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात आतिशी मार्लेनाचे आई-वडील गिलानीसोबत मंचावर होते. या कार्यक्रमात 'एक अफजल मेला तर लाखो जन्मतील' अशा घोषणा देण्यात आल्या. आतिशी मार्लेनांच्या आई-वडिलांनी सय्यद गिलानीची अटक आणि छळ नावाचा लेख लिहिला आहे. देव दिल्लीचे रक्षण करो!," असे मालिवाल यांनी आपल्या नव्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मालिवाल यांच्या आतिशींवरील टीकेनंतर आप नेते संतप्त झाले आहेत. स्वाती मालीवाल यांच्या टीकेनंतर आप खासदार संदीप पाठक यांची प्रतिक्रिया आली आहे. स्वाती मालीवाल यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा द्यावा, असे संदीप पाठक म्हणाले. स्वाती मालीवाल भाजपचा प्रचार करत असल्याचे पाठक यांनी म्हटलं.