खलिस्तानवाद्यांकडून पुन्हा एकदा भारताला मोठी धमकी देण्यात आली आहे. यावेळी राज्यसभा खासदाराला फोन करुन संसद आणि लाल किल्ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी आता राज्यसभा खासदाराने राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात फोन वरुन धमकी दिल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीने गुरपतवंत सिंग पन्नूचे नावही घेतल्याचे खासदारने म्हटलं. गुरपतवंत सिंग हे ‘शीख फॉर जस्टीस’ नावाची खलिस्तानसमर्थक संघटना चालवतात. या संघटनेवर भारतात बंदी आहे.
केरळचे राज्यसभा खासदार व्ही शिवदासन यांना हा धमकीचा फोन आला होता. व्ही शिवदासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना फोनवरून ही धमकी मिळाली होती. फोनवरुन समोरच्या व्यक्तीने संसद भवन आणि लाल किल्ल्यावर बॉम्बने हल्ला केला जाईल, असं म्हटलं. धमकी देणाऱ्यानेहा फोन शिख फॉर जस्टिसच्या नावाने केला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. खासदार व्ही शिवदासन यांनी तात्काळ राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहून याबाबत कळवलं. व्ही शिवदासन हे केरळमधील सीपीआय(एम) खासदार आहेत.
"मला शिख फॉर जस्टिसच्या नावाने धमकीचा फोन आला होता हे मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. ही धमकी २१ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता मिळाली. जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी दिल्ली विमानतळ लाउंजमध्ये होतो आणि माझ्यासोबत खासदार ए रहीम थी होते. शीख फॉर जस्टिस खलिस्तानी सार्वमताचा संदेश देऊन भारतीय संसद भवन आणि लाल किल्ला परिसरात बॉम्बस्फोट करणार आहे. शिखांचे अस्तित्व धोक्यात असल्याने भारतीय राज्यकर्त्यांचे डोळे उघडणे हा यामागचा उद्देश आहे. खलिस्तानी जनमताचा अनुभव घ्यायचा नसेल तर घरीच रहा," असे फोनवर सांगितल्याचे व्ही शिवदासन म्हणाले.
हा संदेश शिख फॉर जस्टिसचे जनरल काउंसिल गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या नावावर असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. व्ही शिवदासन यांनी या प्रकरणाची माहिती नवी दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांना दिली आणि तक्रार दाखल केली आहे. त्यांनीही या प्रकरणाची दखल घेत पुढील कारवाईची विनंती केली आहे.