ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७- दिल्लीत राज्यातील खासदारांचे हक्काचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र सदनात जेवणाची योग्य सुविधा नाही, रुम्सही मिळत नाही, कॅंटिनमधील पदार्थ वेळेवर पोहोचत नाही अशा असंख्य तक्रारींचा सामना या सदनात राहणा-या खासदारांना करावा लागत आहे. महाराष्ट्र सदनातच राज्याच्या खासदारांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेने महाराष्ट्र सदनात आंदोलन केले.
महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या ४८ खासदारांनी दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाला हजरी लावणे अपेक्षीत असते. दिल्लीत राज्यातील खासदारांसाठी महाराष्ट्र सदन बांधण्यात आले आहे. मात्र या सदनात राज्याच्या खासदारांकडेच दुर्लक्ष होत असल्याची तक्रार खासदार करत आहे. कॅंटिनमध्ये फोन करुनही कोणी ऑर्डर घ्यायला येत नाही, रुम्समध्ये पुरेशा सोयी सुविधा दिल्या जात नाही, कधी कधी रुम्समध्ये स्वच्छताही नसते अशा असंख्य तक्रारींचा पाढा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी वाचून दाखवला. संसदेचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सदनात नेमलेल्या निवासी आयुक्ताने सर्व खासदारांची बैठक घेऊन राज्याच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे अपेक्षीत असते. मात्र ही बैठकच होत नाही असा आरोपही सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. काही वेळेला सदनातील रुम्स राज्याच्या खासदारांसाठीच उपलब्ध नसतात असेही एका खासदाराने सांगितले. या तक्रारींविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी शिवसेना खासदारांनी महाराष्ट्र सदनातच आंदोलन केले. शिवसेना खासदारांनी आंदोलन सुरु केले असता सदनातील निवासी आयुक्तांनी तिथून काढता पाय घेतल्याचे शिवसेना खासदारांनी सांगितले.