मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 15:06 IST2020-06-08T15:02:15+5:302020-06-08T15:06:28+5:30
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची दुसरी जागा संकटात; आमदारांच्या राजीनाम्यांमुळे अडचणींत वाढ

मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?
अहमदाबाद: राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. आमदारांच्या राजीनाम्यांमुळे राज्यसभेची निवडणूक काँग्रेसला जड जाणार असल्याचं दिसू लागलं आहे. सुरुवातीचं संख्याबळ पाहता काँग्रेसच्या दोन जागा येतील, असं वाटत होतं. मात्र आमदारांच्या राजीनाम्यांनंतर आता काँग्रेसची दुसरी जागा धोक्यात आली आहे. मात्र तरीही दोन्हीही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत.
राज्यसभेची दुसरी जागा निवडून आणण्यासाठी केवळ आणखी एका मताची आवश्यकता असल्याचं काँग्रेसचे गुजरात प्रभारी राजीव सातव यांनी सांगितलं. सातव हिंगोलीचे माजी खासदार आहेत. २०१४ मध्ये ते लाटेत निवडून आले होते. आता मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पक्षानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 'दुसरी जागा निवडून आणण्यासाठी फक्त एका मताची गरज आहे. आम्ही नंबर गेमवर चर्चा करणार नाही. हा आमच्या रणनीतीचा भाग आहे,' असं सातव यांनी सांगितलं.
सातव यांनी २०१७ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीचं उदाहरण दिलं. त्यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल रिंगणात होते. त्यावेळीही काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे काँग्रेसची जागा संकटात सापडली होती. रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडी सुरू होत्या. काँग्रेस, भाजपामधील वकील नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पटेल यांनी विजय मिळवला होता. २०१७ मध्ये घडलेल्या घडामोडींकडे सातव यांनी लक्ष वेधलं. 'आम्ही नुसते बसलेलो नाही. संख्याबळावर काम करत आहोत,' असं सातव म्हणाले.
२०१७ मध्ये झालेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७७ जागा जिंकल्या. मात्र आता पक्षाचे ६५ आमदार आहेत. मार्चपासून ८ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी काँग्रेसनं आमदारांना अंबाजी, बडोदा आणि राजकोटला पाठवलं आहे.
राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेसकडे सध्या ६५ आमदार असल्यानं काँग्रेसची दुसरी जागा निवडून येणं अवघड आहे. काँग्रेसकडून शक्तीसिंह गोहिल आणि भरत सिंह सोळंकी मैदानात आहेत. यातही गोहिल पहिली जागा लढवत आहेत. त्यामुळे सोळंकी यांचा विजय कठीण मानला जात आहे. भाजपानं नरहरी अमीन यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरवल्यानं सोळंकी यांच्यासमोर आव्हान आहे.
गुजरातमधील राज्यसभेच्या चार जागा रिक्त होत असून यातील तीन जागा भाजपाकडे, तर एक जागा काँग्रेसकडे आहे. राज्यसभेच्या चार जागांसाठी भाजपानं तीन, तर काँग्रेसनं दोन उमेदवार दिले आहेत. विधानसभेत भाजपाचे १०३ आमदार आहेत. त्यामुळे सुरुवातीला त्यांची तिसरी जागा धोक्यात होती. मात्र काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यांमुळे काँग्रेसचीच दुसरी जागा संकटात आली आहे. याचा फायदा भाजपाला मिळू शकतो.
'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ
अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणार
बापरे! अवघ्या ५ दिवसांत ५००००; कोरोना रुग्णांचा वेग धडकी भरवणार
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी