...म्हणून मी काँग्रेसची साथ सोडली! आठवले राज्यसभेत स्पष्टच बोलले; संपूर्ण सभागृह खो खो हसले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 03:25 PM2022-02-07T15:25:10+5:302022-02-07T15:27:09+5:30
राष्ट्रपतींच्या अभिभाषावर बोलताना राज्यसभेत रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी तुफान बॅटिंग केली. लोकशाहीत विविध पक्ष असतात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र तरीही आपण सर्वजण एक आहोत, असं आठवले म्हणाले. मला काँग्रेसचा बराच अनुभव आहे. भाजपसोबतही मी बरीच वर्षे आहे. माझे सर्वच पक्षांशी चांगली संबंध आहेत. लोकशाहीत सर्वांशी उत्तम संबंध असायला हवेत, असं मत आठवलेंनी व्यक्त केलं.
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचं आठवलेंनी तोंडभरुन कौतुक केलं. 'काँग्रेसनं खरगेंना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र कर्नाटकात जेव्हा त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी होती. तेव्हा काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं नाही. त्यांना मुख्यमंत्रिपद द्यायला हवं होतं,' असं आठवले म्हणाले. त्यावर सभापती हरिवंशदेखील हसू लागले. तुम्ही अभिभाषावर बोलत आहात याची आठवण हरिवंश यांनी करून दिली.
हरिवंश यांनी आठवण करून दिल्यानंतरही आठवलेंची बॅटिंग सुरूच होती. 'खरगे आमच्या दलित समाजाचे आहेत. अतिशय सक्रीय नेते आहेत. ते आरपीआयमध्ये असोत वा काँग्रेसमध्ये. आमची मैत्री कायम आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी होती. पण त्यांना पद देण्यात आलं नाही. मला मंत्री केलं नाही, त्यावेळी मी काँग्रेसची साथ सोडली होती,' असं आठवले म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. तुम्हीही काँग्रेसची साथ सोडायला हवी होती. पण तुम्ही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली नाही, असं आठवले खरगेंना उद्देशून म्हणाले.