ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - राज्यसभेमध्ये सोमवारी नाटयपूर्ण दुश्य पहायला मिळाले. अण्णाद्रमुकच्या नेत्या शशीकला पुष्पा यांना राज्यसभेमध्ये बोलता बोलता रडू कोसळले. आपल्या जीवाला धोका असून, राज्यसभेचे सदस्यत्व सोडण्यासाठी आपल्यावर दबाव येत आहे असे सांगत असतानाच शशिकला यांना रडू कोसळले.
दोन दिवसापूर्वीच द्रमुक खासदार तिरुची सिवा यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे शशिकला पुष्पा चर्चेत आल्या होत्या. दिल्ली विमानतळावर झालेल्या वादातून त्यांनी तिरुची सिवा यांच्या कानाखाली लगावली होती. शशिकला यांच्या विधानानंतर लगेचच जयललिता यांनी पक्षातून शशिकलाची हकालपट्टी जाहीर केली.
पक्षाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल ही कारवाई केल्याचे अण्णाद्रमुककडून सांगण्यात आले. पक्ष आणि कार्यकर्त्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले म्हणून आपण तिरुची सिवा यांच्या कानाखाली लगावली असे शशिकला यांचे म्हणणे होते. या घटनेनंतर पुष्पा यांनी सिवा यांची माफीही मागितली होती. पुष्पा २०१४ पासून राज्यसभेवर आहेत.
Sasikala Pushpa breaks down in Rajya Sabha, says "there is a threat to my life" pic.twitter.com/pG0w2stY9X— ANI (@ANI_news) August 1, 2016