RajyaSabha Byelection : लवकरच 9 राज्यांतील राज्यसभेच्या 12 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन जागांवर आणि हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिशामधील प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये राजस्थानमधून केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू, बिहारमधून उपेंद्र कुशवाह आणि मनन कुमार मिश्रा यांचा समावेश आहे. तिन्ही उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने या महिन्यात राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली होती. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट होती. 3 सप्टेंबर रोजी संबंधित राज्यांच्या विधानसभांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि रात्री निकाल जाहीर होईल.
दरम्यान, आसाममधील कामाख्या प्रसाद ताशा आणि सर्बानंद सोनोवाल, बिहारमधील मीसा भारती आणि विवेक ठाकूर, हरियाणातील दीपेंद्र हुडा, मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया, महाराष्ट्रातील छत्रपती उदयनराजे भोसले, पीयुष गोयल आणि राजस्तानातून केसी वेणुगोपाल आणि त्रिपुरामधून बिप्लब देव लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे, तसेच तेलंगणातील केशव राव आणि ओडिशातील ममता मोहंता यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या 12 जागा रिक्त झाल्या आहेत. निवडून आलेले सदस्य उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेचे सदस्य असतील.