सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:22 PM2024-02-13T21:22:40+5:302024-02-13T21:23:34+5:30
सोनिया गांधी यांना यंदा लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवले जाणार आहे.
RajyaSabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूक होणार आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि 6 वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या सोनिया गांधींना यंदा राज्यसभेवर पाठवले जात आहे. त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्या 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राजस्थानमधून राज्यसभेवर गेलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे, त्यामुळे त्यांच्या जागी सोनिया गांधी यांना राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. रिपोर्टनुसार, उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरतेवेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेदेखील उपस्थित राहतील.
राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूक
देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणुका होणार आहेत. 29 जानेवारी रोजी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. 56 पैकी 10 जागा काँग्रेसला मिळणार हे निश्चित आहे. यामध्ये राजस्थानची एक जागाही येते. याच जागेवरुन सोनिया गांधी राज्यसभेवर जातील.
सोनिया गांधी रायबरेलीतून लोकसभा खासदार
1999 मध्ये अमेठीमधून लोकसभा निवडणूक जिंकून काँग्रेस अध्यक्ष म्हणून संसदीय राजकारणाला सुरुवात करणाऱ्या सोनिया गांधी 2004 पासून सातत्याने रायबरेलीच्या खासदार आहेत, मात्र यावेळी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे. सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत नसतील तर प्रियंका गांधी वाड्रा यांना रायबरेलीमधून लोकसभेचे तिकीट दिले जाऊ शकते.