मुंबई- मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रदर्शन घडल्याने सांगता झाली. दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी शुक्रवारी चंद्र दर्शन झाल्यावर ईद उल फितर शनिवारी साजरी होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आज देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाते आहे. पहाटेच्या नमाज अदा करण्यापासून रमजान ईदचा उत्साह दिसू लागला आहे. सकाळपासूनच देशातील विविध भागात नमाज अदा करण्यासाठी मुस्लीम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते आहे.
आज मुस्लीम बांधव एकमेकांच्या घरी जाऊन गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देतात.शुक्रवारी संध्याकाळी समाजबांधवांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमजान ईद असल्याने देशभरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभाव आणि प्रेम वाढीला लागावे यासाठी प्रार्थनाही केली आहे.
दरम्यान, दिल्लीतील जामा मशिद, श्रीनगरमधील रदापोरा, मुंबईतील मिनार मशिद अशा विविध ठिकाणी सकाळपासूनच नमाज अदा करण्यासाठी मुस्लीम बांधवांची हजेरी पाहायला मिळते आहे.