- विकास झाडेनवी दिल्ली : सिंघू, टिकरी आणि गाजीपूर सीमा आहे तशाच अडविल्या जातील, सोबतच देशभर महापंचायत आयोजित करून ‘आता पेटवू सारे रान’चा बिगुल शेतकरी नेत्यांनी फुंकला आहे. आज कुरुक्षेत्रात झालेल्या महापंचायतीला लाखावर शेतकरी उपस्थित होते. संयुक्त किसान मोर्चाची बुधवारी बैठक होत आहे. आज शेतकरी आंदोलनाचा ७६वा दिवस आहे. २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर जाऊन ध्वज फडकविणाऱ्या दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलन मंगळवारी सकाळी पंजाबमधून अटक केली. सिद्धू १४ दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल सेलच्या पथकाने त्याला पंजाबमधील झिरकपूर या भागातून अटक करण्यात आली आहे. गणतंत्र दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाची नीती बदलली आहे. जे शेतकरी सिंघू, टिकरी, गाजीपूर आणि अन्य सीमांवर आहेत, ते तिथेच थांबतील. मात्र, शेतकरी नेते देशभर महापंचायतीचे आयोजन करतील. आज कुरुक्षेत्रातील गुमतलू गढू इथे राकेश टिकैत यांची महापंचायत झाली. त्या सभेला लाखांवर शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्रातून संदीप गिड्डे पाटील, युद्धवीर सिंग हेही मार्गदर्शक होते. राकेश टिकैत हे आता केंद्रस्थानी आहेत. त्यांना विविध ठिकाणांहून सभेसाठी आमंत्रित केले जाते. येत्या २० फेबु्वारीला महाराष्ट्रात भव्य सभा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संदीप गिड्डे पाटील यांनी दिली. स्थळ मात्र ठरायचे आहे. शेतकऱ्याचा मृत्यूसीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धान्यवाटप करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू झाला. रोहतक जिल्ह्यातील दीपक नावाचा २८ वर्षांचा हा शेतकरी स्वत: आंदोलनात सहभागी होता. गेल्या आठवड्यात ट्रॅक्टरवर बसून तो धान्याचे वाटप करीत होता. अचानक तोल गेल्याने तो ट्रॅक्टरवरून पडला.
Farmers Protest: आता पेटवू सारे रान; महापंचायतीस लाखो शेतकऱ्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 6:43 AM