नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारशी अनेक फेऱ्या झाल्यानंतरही यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. कोरोना संकटामुळे शेतकरी आंदोलनावर परिणाम झालेला पाहायला मिळाला. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला चालना देण्यासाठी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार असल्याची घोषणा टिकैत यांनी केली आहे. (rakesh tikait announced farmers will gherao raj bhavans across the country on june 26)
राकेश टिकैत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, शनिवार, २६ जून रोजी लोकशाही वाचावा, शेतकरी वाचवा दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच मीडियाशी बोलताना टिकैत म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला आता सात महिने होतील. यामुळे राष्ट्रपतींनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. तसेच २६ जून रोजी शेतकरी देशभरातील सर्व राजभवनांना घेराव घालतील. जल, जंगल आणि जमीन वाचवायची असेल, तर चोरांविरोधात लढाई, संघर्ष करावा लागेल, असे टिकैत यांनी सांगितले.
“माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेतला, हा लढा मोठा आहे”: चिराग पासवान
प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला विशेष कार्यक्रम
गतवर्षीच्या २६ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी केला आहे.
“महिलांचा सन्मान करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठेय? सत्तेपाई सत्व गमावले”;
दरम्यान, २६ मे रोजी शेतकरी आंदोलनाला सहा महिने झाल्याच्या पार्श्वभूमीवर देश पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशातील प्रमुख १२ पक्षांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. तसेच अलीकडे काही दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. तसेच अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या भेटीही घेणार असल्याचे सांगितले होते.