Rakesh Tikait: शेतकरी कायद्यांसंदर्भात प्रचंड मोठे आंदोलन उभे करून ते यशस्वी करून दाखवणाऱ्या भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात असतानाच राकेश टिकैत यांनी वेगळेच भाकित वर्तवले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
मेरठ येथे बोलताना राकेश टिकैत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. देशात भाजपच सरकार स्थापन करेल. पण पंतप्रधानपदी नवा चेहरा दिसू शकतो. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही विधाने केली असून, त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल...
आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचेच पुनरागमन होईल. सुरुवातीला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. पण मध्येच ते पद सोडून राष्ट्रपती होतील. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या जागी अमित शाह पंतप्रधानपदावर बसतील. यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील, असा मोठा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे. सपा आमदार अतुल प्रधान यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राकेश टिकैत मेरठमध्ये आले होते. यावेळी राकेश टिकैत यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात मीडियाने काही प्रश्न विचारले. यावर राकेश टिकैत यांनी सदर प्रतिक्रिया नोंदवली.
दरम्यान, नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुका झाल्या. त्यातील तीन राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली. या राज्यांत भाजपने काँग्रेसला शह दिला. या निकालावर राकेश टिकैत यांनी भाष्य केले. सगळे एकत्र आले नाही तर सर्वांसाठी कठीण होईल, असे राकेश टिकैत म्हणाले.