जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. तसेच, जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला. दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंवर केलेल्या कारवाईनंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी, प्रियांका, मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे, तसेच पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे.
याचबरोबर, शेतकरी नेते राकेश टिकैत हे देखील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे वृत्त आहे. राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम आहेत. राकेश टिकैत म्हणाले की, आधी खेळाडूंची सुटका होईल, त्यानंतर सीमाभागातून निरोप घेतला जाईल. खेळाडूंना आधी सोडावे अन्यथा आम्हालाही अटक करावी. दरम्यान, राकेश टिकैत आपल्या समर्थकांसह दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण पोलीस त्यांना रोखत आहेत.
दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर कारवाई करताना दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला. जंतरमंतर येथून नवीन संसद भवनाकडे मोर्चा काढताना पोलिसांनी ही कारवाई केली. आता कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीची टिकरी सीमा पुन्हा एकदा पूर्णपणे सील करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर बॅरिकेड लावून दिल्लीत प्रवेश करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. दुसरीकडे, कुस्तीपटूंवर केलेल्या कारवाईबाबत दिल्ली पोलिस चारही बाजूंनी घेरले आहे. विरोधी पक्षांनी या कृतीचा निषेध करत याला लाजिरवाणे म्हटले आहे. विशेषत: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट केले आहेत. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, "खेळाडूंच्या छातीवरील पदके ही आपल्या देशाची शान आहे. त्या पदकांसह खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की सरकार निर्दयीपणे आपल्या महिला खेळाडूंचा आवाज बुटाखाली पायदळी तुडवत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे, सरकारचा मग्रूर आणि हा अन्याय संपूर्ण देश पाहत आहे."