शामली : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) हे अनेकदा शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसून आले आहेत. मात्र, आता राकेश टिकैत यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांना आंदोलन करायचे नाही. ते स्वतः उद्ध्वस्त होतील, त्यांचे लोक आम्हालाही उद्ध्वस्त करतील, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी नेते राकेश टिकैत शामलीच्या बाबरी भागातील भाजू गावात असलेल्या किसान पंचायतमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अप्रामाणिकपणा झाल्यास भाजपचाच उमेदवार देशाचा पंतप्रधान होईल. पण, निवडणुका प्रामाणिकपणे झाल्या तर विरोधकांचा पंतप्रधान होईल."
कुस्तीपटूंच्या आंदोलनावर राकेश टिकैत म्हणाले की, भाजपचे सरकारला आम्ही महिला कुस्तीपटूंबद्दल चर्चा करायला लावली. असे करून आम्ही काही गुन्हा केला आहे का? केंद्र सरकार शेतकरी संघटनेची बदनामी करण्यासाठी बसले आहे. दरम्यान, राकेश टिकैत यांनी अनेकवेळा कुस्तीपटूंच्या पाठिंब्याबद्दल बोलले आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.
"आम्ही फक्त एका सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत असे नाही. छत्तीसगड, हरयाणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. आमच्या आंदोलनाबाबत कोणताही पक्ष चुकीचे काम करेल, त्याला आम्ही तीव्र विरोध करू", असे राकेश टिकैत म्हणाले. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण यांच्यावर अलीकडेच महिला कुस्तीपटूंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही कुस्तीपटूंचे आंदोलन योग्य असल्याचे म्हटले आहे.