अलीगड: उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (UP Election 2022) पक्षांतरासह राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. यातच आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजप आणि योगी सरकारवर टीका केली आहे. योगी सरकारची फक्त प्रवचन सुरू आहेत. त्यांच्या बोलण्यात येऊ नये, असा टोला राकेश टिकैत यांनी लगावला आहे.
गेल्या १३ महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांची एकप्रकारे ट्रेनिंगच सुरू आहे. याहीनंतर आता आमची भूमिका काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत असेल, तर त्या ट्रेनिंगचा काही उपयोग झाला नाही, असेच म्हणावे लागेल. अर्ध्या किमतीत उत्पादने विकून निवडणुकांच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. या लोकांना केवळ राजकारण करायचे आहे, असा टोला लगावण्यात आला.
हिंदू-मुस्लिम आणि जिनांचा मुद्दा अडीच महिन्यांपर्यंत चालेल
देशात आता हिंदू-मुस्लिम आणि जिनांचे मुद्दे उपस्थित केले जात आहे. मात्र, हे केवळ अडीच महिन्यांपर्यंत चालेल. पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हाती आले की, या सगळ्या गोष्टी बंद होतील, असा दावाही राकेश टिकैत यांनी केला आहे. तसेच आम्हाला माहिती आहे सरकार कोणाचे येणार आहे. जनता मात्र या लोकांना मतदान करणार नाही, असेही राकेश टिकैत म्हणाले. शेतकऱ्यांनी प्रवचन करणाऱ्यांपासून दूर राहावे. ३१ तारखेला आम्ही विरोध प्रदर्शन करणार आहोत, असा इशाराही राकेश टिकैत यांनी दिला आहे.
दरम्यान, एका सर्वेक्षणातून मतदारांची मन की बात समोर आली आहे. योगी सरकारवर नाराज आहात आणि ते बदलण्याची इच्छा आहे का, या प्रश्नाला ४७ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे. तर सरकारच्या कामकाजावर नाराज आहोत, पण ते बदलण्याची गरज वाटत नाही, असे मत २७ टक्के लोकानी व्यक्त केले. सरकारवर नाराज नाही, त्यामुळे ते बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत २६ टक्के लोकांचं आहे.