पालमपूर: वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. तर, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत देशातील विविध राज्यांमध्ये दौरे करत शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. रविवारी राजस्थानच्या अबू रोड येथून राकेश टिकैतगुजरातमध्ये दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर व्हायला हवी, असे टिकैत म्हणाले. (rakesh tikait on gujarat visit)
राकेश टिकैत यांनी बनासकांठा येथील पालमपूरमध्ये किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी टिकैत यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी शंकर सिंह वाघेला उपस्थित होते. येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करायला हवी, असे टिकैत म्हणाले.
१०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार
आंदोलनात कसे सहभागी व्हायचे हे तुम्ही ठरवा
गुजरातमधील शेतकऱ्यांनी आंदोलनात कसे सहभागी व्हायचे, हे तुम्हीच ठरवायला हवे. युवकांनी, तरुण वर्गाने अधिकाधिक संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी व्हायला हवे, असा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. केंद्र सरकार संपूर्ण देशात गुजरात मॉडेल लागू करू इच्छिते, अशी टीका करत रिलायन्सला ६० गावे देऊन टाकली. तसेच देशभरातील शेतकऱ्यांची जमीन कंपनी, व्यवसायिकांना देऊन टाकण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा दावा टिकैत यांनी केला.
सरकार शेतकऱ्याच्या विरोधात
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून, त्यांचे केवळ शोषण सुरू आहे. सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नाहीत, असा आरोप टिकैत यांनी केला. गुजरातमध्ये प्रवेश करताना कोरोना रिपोर्टबाबत विचारले असता, ते टिकैत म्हणाले की, त्यांच्याकडे सर्व प्रकारची कागदपत्रे आहेत. आपला पासपोर्ट दाखवत, आता गुजरातमध्ये प्रवेश करण्यासाठी याची आवश्यकता आहे का, असा खोचक टोला टिकैत यांनी लगावला.
दरम्यान, १०० वेळा हल्ले झाले, तरी नियोजित कार्यक्रमात कोणताही बदल करणार नाही. महापंचायत थांबणार नाही, त्या होतच राहणार, एवढेच नाही तर, शेतकरी आंदोलनही थांबणार नाही, असा एल्गार टिकैत यांनी केला. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात आहे.