नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. आज मोदींनी या संदर्भात राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या त्रुटीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, उपराष्ट्रपतींनी सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा त्रुटी पुन्हा होणार नाहीत असं म्हटलं आहे. याच दरम्यान आता भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देत मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा एक स्टंट आहे" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी "केंद्र सरकार म्हणते की सुरक्षेत त्रुटी होती आणि पंजाब सरकार म्हणते की पंतप्रधान तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या रॅलीतील खुर्च्या रिकाम्या होत्या. दोघेही केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांनी तिथे जायला नको होतं" असं म्हटलं आहे. तसेच "अशाप्रकारची जी बातमी सुरू आहे की पंतप्रधान वाचले, सुखरूप परतले वैगेरे यावरून असं वाटतं की हा पूर्णपणे एक स्टंट आहे."
"जनतेची सहानुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न"
"मीडिया देखील म्हणत आहे की तिथून सुखरूप आले. असं होतं तर मग ते तिथे गेलेच कशाला? हा पूर्णपणे एक जनतेची सहानुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे" असा आरोप देखील राकेश टिकैत यांनी केला आहे. याच दरम्यान काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी एक व्हिडीओ ट्विट करून काही शंका उपस्थित केल्या आहेत. श्रीनिवास बी व्ही (Congress Srinivas BV) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी आंदोलकांच्या हातात भाजपाचा झेंडा कसा काय? असा प्रश्न विचारला आहे.
"जर हे लोक आंदोलनकर्ते होते तर त्यांच्या हातात भाजपाचा झेंडा का होता?"
"जर हे लोक आंदोलनकर्ते होते तर त्यांच्या हातात भाजपाचा झेंडा का होता? पंजाब पोलिसांनी यांना रोखलं नाही तर केंद्र सरकारच्या अख्त्यारित असणाऱ्या एसपीजी सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीजवळ का येऊ दिलं? आयबी अधिकारी कुठे होते? ते मोदी जिंदाबादच्या घोषणा का देत होते?" असे प्रश्न श्रीनिवास यांनी आपल्या ट्विटमध्ये विचारले आहेत. श्रीनिवास यांनी याआधी Modi ji, How’s the Josh? #Punjab असं ट्वीट केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या ट्वीटमुळे पंजाब सरकारवर अनेकांनी संशय़ व्यक्त केला. तसेच पावसाचा आणि त्यामुळे सभेच्या ठिकाणी उडालेल्या गोंधळाचा व्हिडीओ देखील श्रीनिवास ट्विटरवरुन शेअर केला होता.