नवी दिल्ली: केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. मात्र, यानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो, असा पलटवार राकेश टिकैत यांनी केला आहे. (rakesh tikait says we said that the opposition in the country is weak)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो, ज्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आपल्या देशात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी व्हिजा लागतो का, असे खोचक सवाल करत अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत, असे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले.
आपल्याकडे विरोधी पक्ष कमकुवत आहे
आपल्याकडील विरोधी पक्ष फारच कमकुवत आहे. विरोधी पक्ष मजबूत असता, तर आम्हांला एवढे मोठे आंदोलन करावे लागले नसते, रस्त्यावर उतरावे लागले नसते. विरोधकांनी मजबूत व्हायला हवे. हीच गोष्ट आम्ही ममता बॅनर्जी यांना सांगितली, असे टिकैत यांनी म्हटले आहे.
“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद
केंद्र सरकारवर शेतकरी कायद्यासंदर्भात दबाव टाकावा
तुम्हीही ममता यांच्या प्रचारात सहभागी होता, असे विचारल्यावर टिकैत म्हणाले की, आम्ही प्रचार केला म्हणूनच आम्ही त्यांच्यासमोर आमच्या मागण्या मांडत आहोत. आम्हाला असे वाटत आहे की, विरोधी पक्षांनी आमच्या सोबत यावे आणि केंद्र सरकारवर शेतकरी कायद्यासंदर्भात दबाव टाकावा, अशी अपेक्षा टिकैत यांनी व्यक्त केली.
कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली
ममता बॅनर्जी यांची केंद्रावर जोरदार टीका
ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पश्चिम बंगालमध्ये आम्ही ठराव मंजूर करून केंद्राचे कृषी कायदे रद्द केले. शेतकऱ्यांसाठी उपोषण केले, आंदोलनात सहभागी झाले. जोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहील, तोपर्यंत माझा याला पाठिंबा राहील, असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी टिकैत यांना दिले आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा का करत नाही, अशी विचारणा करत वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी केली.