टिकैत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, "भाजप फसवणूक करणारा पक्ष, पुढील लक्ष्य संसदेबाहेर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 02:23 PM2021-03-14T14:23:46+5:302021-03-14T14:26:06+5:30
Farmers Protest : गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन
गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि एमएसपीवर कायदा करण्याच्या आपल्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. यादरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आंदोलन अधिक मोठं करण्यासाठी निरनिराळ्या राज्यांमध्ये महापंचायतींचं आयोजन करत आहेत. नुकताच टिकैत यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. या ठिकाणी त्यांनी भाजप सोडून अन्य कोणत्या पर्यायांना मत देण्याचं आवाहन केलं. तसंच यावेळी त्यांनी भाजप हा फसवणूक करणारा पक्ष असून आपलं पुढील ध्येय संसदत मंडई सुरू करणं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
"ज्या दिवशी संयुक्त मोर्चा निर्णय घेईल. त्या दिवशी संसदेच्या बाहेर नवी मंडई उघडली जाईल," असं टिकैत म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी दिल्लीत पुन्हा ट्रॅक्टर शिरणार असल्याचा दावाही केला. आमच्याकडे ३.५ लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख शेतकरी आहेत. आमचं पुढील लक्ष्य संसंदेत पिकांची विक्री करण्याचं असल्याचंही ते म्हणाले.
मेधा पाटकर यांच्यासह केलं संबोधित
राकेश टिकैत जेव्हा कोलकात्यात पोहोचले त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. यानंतर टिकैत यांनी शहरात आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदिग्राम येथे सामाजिक कार्यकर्त्या मधा पाटकर यांच्यासह शेतकऱ्यांना संबोधित केलं. "भाजप सरकार शेतकरी आणि शेतकरी आंदोलनाचा कणा तोडण्याचे प्रयत्न करत आहे. हे जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. भाजपला मत देऊ नका. जर त्यांना मत दिलं तर ते तुमची जमिन मोठ्या कॉर्पोरेट्स आणि उद्योगांना देऊन टाकतील. ते तुमची उपजीविका धोक्यात टाकतील. देशातील उद्योगपतींच्या समूहाला तुमच्या जमिनी देतील आणि तुम्हाला धोक्यात टाकतील," असंही टिकैत यावेळी म्हणाले.
फसवणूक करणारा पक्ष
"भाजप हा फसवणूक करणारा पक्ष आहे. आम्ही भाजपचा विरोध करणाऱ्यांसोबत आणि शेतकरी, गरीबांसोबत उभे राहणाऱ्यांसोबत आहोत," असं ते म्हणाले. परंतु पश्चिम बंगालमध्ये शेतकरी महापंचायत आयोजित करण्याचा अर्थ कोणत्याही पक्षाला समर्थन देणं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आपण या ठिकाणी कोणत्याही विशेष पक्षासाठी मतं मागण्यासाठी आलो नाही. आपण बंगालच्या शेतकऱ्यांकडून भाजपच्या विरोधात लढाई सुरू करण्यासाठी आव्हान करण्यास आल्याचं टिकैत यांनी नमूद केलं.