ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १४ - सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत रहाणारी अभिनेत्री राखी सावंत आगामी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. बसप प्रमुख मायावती यांच्या विरोधात राखीला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी दिली.
भाजपसोबत आघाडी करुन आगामी उत्तरप्रदेशची निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडे मायावती निवडणूकीच्या लढाईपासून दूर रहातात. विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची. पण त्यांनी आपला विचार बदलला आणि निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या विरोधात राखी सावंतला निवडणूक मैदानात उतरवू असे आठवलेंनी सांगितले. राखी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या महिला शाखेची अध्यक्ष आहे.
भाजप बरोबर आघाडी झाली नाही तर, आरपीआय स्वबळावर रिंगणात उतरेल. आम्ही ४०३ पैकी २०० जागांवर उमेदवार उभे करु. उत्तरप्रदेशातील दलितांचा मायावतींकडून भ्रमनिरास झाला आहे. त्यांना पर्यायाची गरज आहे त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार असे त्यांनी सांगितले. रामदास आठवले सामाजिक न्यायखात्याचे राज्यमंत्री आहेत.