नवी दिल्ली - देशभरात आज सगळीकडे रक्षाबंधनांचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांसह नेते मंडळीही बहिणींकडून राखी बांधून घेत आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हटके पद्धतीने सण साजरा केला. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, शिपाई, माळी आणि ड्रायव्हरच्या मुलींनी नरेंद्र मोदींना राखी बांधली.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी लहान मुलींसोबत पंतप्रधान मोदींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. पीएमओ कार्यालयाकडून याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मोदींना राखी बांधणाऱ्या या मुली कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. परंतु या मुली पंतप्रधान मोदींसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे मोदींसाठीही आजचा दिवस विशेष ठरला आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा सण देशभरात श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. तर दुसरीकडे राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयासमोरील पोलीस चौकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस भगिनींकडून राखी बांधण्यात आली.
त्याचसोबत रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधारआश्रम ट्रस्ट या संस्थेतील राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. त्यांच्याकडून राखी बांधून घेताना पुन्हा अशी वेळ कोणत्याही भगिनीवर येऊ नये असा मनोमन संकल्प केल्याचं शिंदे यांनी म्हटलं.